बंद

रायगड जिल्ह्यामधील किल्ले

श्रेणी अॅडवेन्चर
  • रायगड किल्ला :

    रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.

    रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून त्याचे नाव “गंगासागर तलाव” असे आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग “महा-दरवाजा” मधून जातो. किल्ल्यामध्ये असलेल्या राज्याच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून ती नगारखाना दरवाज्याकडे तोंड करून ठेवली आहे. सिहासनाजवळील भाग ध्वनीलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे कि दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरीत्या ऐकू येऊ शकतात. रायगड किल्ल्यावरती उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज असून त्याला “हिरकणी बुरूज” असे म्हणतात.

  • मुरुड-जंजिरा किल्ला :

    मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला ‘दरिया दरवाजा’ असे म्हणतात. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पहावयास मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावरती पुरातन काळी हरतर्हेच्या सोयीसुविधा जसे महाल, दराबारीसाठी खोल्या, मशीद, दोन छोटी गोड्या पाण्याची तळी इत्यादी उपलब्ध होते. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुस्थितीत आहे.

    मुरुड-जंजिरा किल्ल्यावरती असलेल्या तीन महाकाय तोफा – ‘कालालबंगडी’, ‘चावरी’, ‘लांडा कासम’ या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. असे म्हणतात कि पूर्वी या तोफा त्यांच्या लांबपल्ल्याच्या माऱ्यासाठी ओळखल्या जायच्या.

  • कुलाबा किल्ला :

    कुलाबा किल्ला हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे दोन दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वेशिष्टय आहे. इसवी सन १७१३ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासाहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले.

  • सुधागड किल्ला :

    सुधागड (भोरपगड) किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगामध्ये असलेला प्रेक्षणीय किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून पश्चिमेकडे सुमारे ५० किमी, लोणावळ्यापासून दक्षिणेकडे सुमारे २५ किमी तसेच रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणापासून पूर्वेकडे १० किमी अंतरावर आहे. सुधागड किल्ल्याला भोरपगड असेही नाव आहे. शिवाजी महाराजांनी भोरप गडाचे नाव बदलून सुधागड किल्ला असे केले. सुधागड परिसरात ठाणाळे आणि खन्डसाबळे लेण्यांचे अस्तित्त्व आहे.
    सुधागड पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेस दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहे. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. येथे चार विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.

  • कर्नाळा किल्ला :

    पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर ट्रेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती आहेत.

    कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठय़ासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता जाणवते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.
    पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे.
    कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे,ससे इत्यादी प्राणीही आढळतात.
    हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.

छायाचित्र दालन

  • रायगड किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
  • शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा, रायगड किल्ला
  • नगारखाना दरवाजा, रायगड किल्ला

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.

रेल्वेने

सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.

रस्त्याने

रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.