रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे
चवदार तळे, महाड :
ऐतिहासिक चवदारतळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याची लांबी 100 X रुंदी 100 मीटर असुन सदरचे तळे 5.5 मीटर खोल असुन त्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत या तळ्यातील पाणी प्राशन करुन हा पाणवटा सर्वांसाठी खुला करुन दिला. या सत्यागृहामुळे सामाजिक समतेचे रणशिंग फ़ुंकले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे.
चवदारतळे सत्याग्रह इतिहासात प्रसिध्द असुन या लढ्याची स्मृती तसेच समतेचे प्रतिक म्हणुन दरवर्षी 20 मार्च हा दिन चवदारतळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा केला जातो. हा वर्धापन दिन साजरा करणे करिता संपुर्ण देशातुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी तसेच पर्यटक दरवर्षी आवर्जुन भेट देत असतात. या चवदारतळ्याचे सौदर्यीकरण महाड नगरपरिषदेने पुर्ण केले आहे.
या ऐतिहासिक चवदारतळ्याचे सौदर्यीकरणाचे काम व या सौदर्यीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जुन 1992 रोजी संपन्न झाला आहे. आज सद्यःस्थितीत चवदारतळ्याच्या चारही बाजुने सुशोभित कठडे बांधणेत आले आहे व चवदारतळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारुन त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदारतळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासुन सुमारे 100 फ़ुटावर पाण्यामध्ये चौथरा बांधला असुन या चौथ-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फ़ुट उंचीचा पुर्णाकृती ब्रॉझचा पुतळा उभारण्यात आला असुन त्या ठिकाणी जाण्यासाठी पुल बांधणेत आला आहे व पुतळ्याच्या चबुत-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरलेले आहेत. चवदारतळ्याच्या पश्चिम बाजुकडील जागेमध्ये एक बहूद्देशिय सभागृह बांधण्यात आले असुन या सभागृहाच्या तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांबाबत स्मृतीचित्र / तैलचित्र तयार करण्यात आले असुन या सभागृहाचा उपयोग विविध सभा / कार्यक्रम इ. साठी करण्यात येत आहे व या सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वाचनालयाची सोय आहे. ज्या पाय-यांवरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्यामध्ये उतरुन सत्याग्रह केला त्या पाय-यांचे सुशोभिकरण करण्यात आले असुन त्या ठिकाणी सांची येथील स्तुपाच्या धर्तीवर एक मुख्य कमान (आर्च) उभारणेत आली आहे तसेच त्या पाय-यांजवळील भिंतीलगत सत्याग्रहाच्या वेळेच्या प्रसंगाचे चित्र प्रदर्शित करणारे भिंतीचित्र ट्रीमेट्स मध्ये करण्यात आले आहे. सभागृहाच्या समोरील जागेमध्ये आकर्षक बगीचा करण्यात आला आहे व तेथे बागेच्या मध्यभागी हायमास्ट लायटिंग करण्यात आले आहे.
चवदारतळ्यापासुन जवळच दिनांक 25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह मनुस्मृती दहन करुन सामाजिक विषमतेला तिलांजली दिली. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ पिपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांच्या मालकीच्या जागेमध्ये क्रांतीस्तंभ उभारण्यात आला आहे. हा क्रांतीस्तंभ सामाजिक समतेचे प्रतिक म्हणुन ओळखला जातो.
या ऐतिहासिक चवदारतळ्याचे ठिकाण महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असुन महाड शहर हे सावित्री नदीच्या किनारी वसलेले आहे. या शहरापासुन महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर खालील प्रमाणे आहे.
- मुंबई ते महाड – 175 कि.मी.
- पुणे ते महाड – 110 कि.मी
- महाड ते किल्ले रायगड – 24 कि.मी.
या शहराच्या हद्दीलगत राष्ट्रीय महामार्ग (मुंबई – गोवा महामार्ग) जात आहे.
करमरकर संग्रहालय – सासवणे :
विनायक पांडुरंग करमरकर, ऊर्फ नानासाहेब करमरकर, (ऑक्टोबर २, इ.स. १८९१; सासवणे, रायगड जिल्हा, महाराष्ट्र – जून १३, इ.स. १९६७) हे मराठी शिल्पकार होते. मुंबईच्या सर जे.जे. कला विद्यालयात ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अलिबागजवळील सासवणे गावात त्यांच्या घरी शिल्पकारांचे करमरकर संग्रहालय उभारण्यात आले आहे. अलिबाग-रेवस रोड येथून १८ किमी अंतरावर स्थित एक संग्रहालय आहे जिथे कै. नानासाहेब करमरकर यांनी बनवलेले शिल्पकार त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात प्रदर्शित केले आहेत. येथे सुमारे १५० सुंदर कोरीव शिल्पे प्रदर्शित आहेत.
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फूट उंचीचा एकसंध पुतळा त्यांनी घडवला. अशा प्रकारचा पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पांतील वैशिष्ट्ये मानली जातात.
करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पे घडवली. त्यानंतर ‘लंडन रॉयल अॅकेडमी’मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलंड या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, ‘स्टोन क्रशिंग’ ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले.
इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये ‘सोसायटी ऑफ आर्टिस्ट्स’च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची ‘शंखध्वनी’ ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला. याच काळात पुण्यातील ‘श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल’ मधील शिवाजीचा अश्र्वारूढ एकसंध ‘पुतळा’ ब्रॉन्झमध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. ‘एका पुतळयाची आत्मकथा’ या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचे कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करून त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्याची स्थापना झाली. पुतळा पुण्याला आणताना कमी उंचीचा बोगदा आला की आगगाडी थांबवून पुतळा थोडा तिरपा करत आणि गाडीने बोगदा पार केला की परत सरळ करीत. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
या संस्मरणीय कामगिरीनंतर करमरकरांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. विठ्ठलभाई पटेल, आचार्य कृपलानी, ऑटो रॉथफिल्ड यांच्या पुतळ्यांसह त्यांची ‘मत्स्यगंधा’, ‘मोरू’ ,’प्रवासी’, नमस्ते’ आदी शिल्पेही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पे घडवली.
‘नानासाहेब’ या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचे कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विश्र्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. तसेच १९६४ साली ललित कला अकादमीने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
१९३० च्या दशकात रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या पुतळाही करमरकरांनी बनवला होता.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ लोहेगाव विमानतळ, पुणे आणि छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबई, महाराष्ट्र ही आहेत.
रेल्वेने
सर्व पर्यटन स्थळासाठी मुंबई (सीएसटी), एलटीटी, कुर्ला टर्मिनस, पुणे रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशन (रायगड जिल्ह्यात) भारतीय रेल्वेच्या मुख्य मार्गांसाठी सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वेचे जवळचे रेल्वे स्थानक पेन्, रोहा, वीर इत्यादी आहेत. पनवेल जंक्शन जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. ते मुंबईला (हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वेचे मुख्य मार्ग), ठाणे (ट्रान्स हार्बर लाइन), रोहा, वसई (पश्चिम रेल्वे) याद्वारे जोडलेले आहे. नेरळहून माथेरान पर्यंत एक “नेरो गेज” रेल्वे मार्ग आहे, याला माथेरान हिल रेल्वे असे म्हणतात.
रस्त्याने
रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) बसांद्वारे रस्त्यांनी जोडलेली आहेत. रायगड जिल्हा सायन-पनवेल एक्सप्रेसवेने मुंबईशी जोडला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग हे पनवेल, खालापूर आणि खोपोलीमार्गे जातात. राष्ट्रीय महामार्ग १७, जो पनवेल येथे सुरु होतो , तो पोलादपूरमार्गे पूर्ण जिल्ह्तातून जातो.