साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा, चिकन (मोठे तुकडे), एक डझन अंडी, अर्धा किलो बटाटे, कांदे-वांगी (आवडीनुसार), सारणासाठी मसाला, जाडे मीठ, चवीपुरता ओवा आणि मध्यम आकाराचं मातीचं मडकं, भांबुर्डीचा पाला व लाकडं किंवा गोवऱ्या.
कृती :
सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे कांदे-बटाटे आणि वांगी ठेवावीत. नंतर थोडासा ओवा व मीठाची पखरण करावी. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं अगदी काळजीपूर्वक बंद करावं.
पोपटी लावण्याची पद्धत :
मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा वितभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलटं ठेवावं. मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्याव्यात. जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं.