बंद

जिल्ह्याविषयी

    रायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले.

    रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात. महड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. विविध सांस्कृतिक परंपरा, धर्म, भाषा असणाऱ्या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी बेने-इस्रायली ज्यू लोकांनी आश्रय घेतला होता.

    रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजवटीतील भव्य आणि चिरेबंदी किल्ले जसे रायगड किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, सुधागड किल्ला इ. आजही पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करतात. रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची औद्योगिक संकुले तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या वैज्ञानिक संस्था असणारा रायगड जिल्हा २१व्या शतकात विविध क्षेत्रांत दैदिप्यमान यश संपादन करीत आहे.